गडचिरोली :अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम अंतर्गत जिल्ह्यातील उपविभागीय समितीस्तरावर वनहक्कासाठी 43 हजार 685 वैयक्तीक दावे प्राप्त झाले होते. त्यापैकी जिल्हास्तरावर 31 हजार 415 दावे मंजूर करण्यात आले आहेत. सामुहिक दाव्यांमध्ये उपविभागीय समितीस 1 हजार 791 दावे प्राप्त झाले. त्यापैकी जिल्हास्तरावर 1 हजार 397 दावे मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन प्रलंबित वनहक्क दाव्याची माहिती घेतली. दरम्यान, त्यांनी प्रलंबित वनहक्क दावे मार्गी लावा, अशा सूचना वनविभागाच्या समन्वय बैठकीत दिल्या. या दाव्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या 16 हजार 796 व इतर पारंपारिक 14 हजार 605 अशा 31 हजार 415 दाव्यांना मान्यता देण्यात आली. यामध्ये 92 हजार 296.34 एकर क्षेत्राचा समावेश आहे. यातील 27 हजार 859 वनहक्क धारकांना 7/12 वाटप करण्यात आला आहे. यामध्ये 3 हजार 556 जणांचे 7/12 अभिलेख वाटप करण्यास शिल्लक आहेत. अपूर्ण प्रस्तावांबाबत वनविभाग, आदिवासी विभाग व महसूल विभाग यांनी त्रुटींबाबत समन्वयाने भूमिका घेवून सदर प्रस्ताव मार्गी लावावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. वनहक्क दाव्यांच्या मंजूरीबाबत प्रादेशिक स्तरावर मंजूरीचे आदेश असावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये 5 हेक्टर पर्यंतचे अधिकार उपवनसंरक्षक यांचेकडे ठेवण्यासाठी मागणी केली जाणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, तीनही विधानसभा मतदारसंघाचे आमदार, उपविभागीय अधिकारी, वन विभागाचे उपवनसंरक्षक उपस्थित होते.