गडचिरोली -वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबईत झालेल्या नियोजन बैठकीत गडचिरोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 40 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. यामध्ये नियतव्यय मर्यादा ही 149 कोटी 64 लाख आहे. याव्यतिरिक्त अजित पवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीनुसार वाढीव 50 कोटी रुपये आरोग्य, शिक्षणासह इतर विषयांसाठी मंजूर केले आहे.
हेही वाचा -गडचिरोलीतील आदिवासींच्या पारंपरिक 'रेला' नृत्याने वेधले मुंबईकरांचे लक्ष
आरोग्य सुविधांसाठी विशेष बाब म्हणून अतिरिक्त 5 कोटी रुपये, नक्षल समर्पित व्यक्ती आणि नक्षल पीडित व्यक्ती यांच्यासाठी 10 कोटी जास्तीचा निधी मंजूर करण्यात आला. नक्षल समर्पित आणि पीडितांबरोबरच पोलिसांच्या राहण्याची उत्तम सोय होण्याकरिता पोलीस निवास्थानासाठी जास्तीचे 15 कोटी मंजूर करण्यात आले. तसेच पोलीस विभागाच्या वाहनांकरिता 1 कोटी वेगळा निधी देण्यात आला. या प्रकारे जिल्ह्यासाठी सन 2020-21 साठी वाढीव निधीसह 231 कोटी 40 लाख रुपये निधीला बैठकीत वित्त मंत्र्यांनी मंजुरी दिली.