गडचिरोली - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यात अद्याप कोणालाही झालेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विदेशातून आलेल्या 21 जणांना आपल्या घरातच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून खर्रा, गुटखा विक्री आणि साठा करण्यासाठी एक वर्षांची बंदी घातली आहे, तर आधार केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना बाधीत असलेल्या दुबई, चीन, अमेरिका अशा वेगवेगळ्या देशांमधून पर्यटन आणि इतर कारणासाठी जावून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ते कोरोना बाधित नसल्याचा वैद्यकीय अहवाल आला आहे. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता, त्यांना 14 दिवस लोकांपासून दूर ठेवण्यात आले आहे. हे नागरिक गडचिरोली शहरातील कुरखेडा, मुलचेरा आणि इतर काही तालुक्यातील रहिवासी आहेत.