गडचिरोली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बाहेरून आलेल्या प्रवाशांची शोध मोहीम जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आली. राज्यात संचारबंदी लागू झाल्यापासून आत्तापर्यंत 19 हजार 500 प्रवाशांची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. यातील प्रत्येक प्रवाशाची दैनंदिन तपासणी गावस्तरीय आशा तसेच आरोग्यसेवकांनी केली. या प्रवाशांची दैनंदिन निरीक्षणे घेण्यासाठी 2 हजार 280 आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावस्तरावर मोहीम राबवून प्रत्येक प्रवाशाचे 14 दिवस निरीक्षण नोंदविले. आज (शनिवारी) क्वारंटाईनचा 14 दिवस कालावधी न संपलेल्या जिल्ह्यातील 2 हजार 250 प्रवाशांची दैनंदिन निरीक्षणे घेणे सुरू आहे.
आत्तापर्यंत बाहेरून जिल्ह्यात आलेल्या 19 हजार 500 प्रवाशांपैकी 17 हजार 220 प्रवाशांचे 14 दिवसांचे निरीक्षण पुर्ण झाले आहे. यातील काही लोकांना खोकला, ताप किंवा श्वसनास त्रास झाल्याने तसेच प्रवाशांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांचे पालन न केल्याने 468 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले गेले. यातील संभाव्य 113 लोकांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले. त्यातील 94 प्रवाशांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे.