गडचिरोली -जिल्ह्यातीलएटापल्ली तालुक्यात कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी चकमक झाली. या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांना यश आले आहे. यामध्ये 6 पुरुष आणि 7 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये एक तास चकमक -
काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रावर ग्रॅनाईट हल्ला करून पोलीस स्टेशन उडवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला. तेव्हापासून पोलीस जवान नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी सकाळी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान पैदी जंगल परिसरात अभियान राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुमारे एक तास झालेल्या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले.
शोध मोहिमेत 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती -
जवानांनी घटनास्थळावर शोध मोहिम राबविली असता 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. या चकमकीत 13 नक्षलवादी ठार तर काही नक्षलवादी जखमी असल्याचेही पोलीस दलाने म्हटले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
कोटमीच्या नजिक नक्षल्यांची बैठक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सी-60 कमांडोंनी जंगलात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सकाळी साडेपाचच्या नक्षल्यांना पोलिसांची चाहूल लागल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला आणि चकमकीला सुरूवात झाल्याचे गडचिरोलीचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
तासभर चालली चकमक
ही चकमक सुमारे तासभर चालली. चकमकीनंतर उरलेल्या नक्षल्यांनी तिथून पळ काढल्याचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पीटीआयला सांगितले. घटनास्थळावरून नक्षल्यांचे मृतदेह हस्तगत केले असून परिसरात शोधमोहिम सुरू असल्याचे गोयल म्हणाले. गडचिरोली पोलीस आणि सी-60 कमांडोंनी संयुक्तरित्या ही मोहीम राबविली. यावेळी सुमारे 40 ते 50 नक्षल्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच नक्षली मारले गेले, असे अंकित गोयल यांनी सुरूवातीला बोलताना सांगितले होते.