गडचिरोली -केंद्र व राज्य सरकारने पालकांचे संमती पत्र घेऊन इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली खरी; पण कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. कोरची तालुक्यातील चार शाळांमधील १३ विद्यार्थिनींची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांवर ओढवले संकट -
राज्य शासनाच्या आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्याअनुषंगाने शाळा निर्जंतुकीकरण, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच विद्यार्थ्यांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात कोरची येथील पार्बताबाई विद्यालयाच्या ५, शासकीय निवासी आश्रमशाळेची १, श्रीराम विद्यालयाची १ व बेतकाठी येथील धनंजय स्मृती विद्यालयाच्या ६ अशा एकूण १३ विद्यार्थिनीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच गडचिरोली येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील ३ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यानंतर आता कोरची तालुक्यातील विद्यार्थ्यांवर हे संकट ओढवले आहे.