गडचिरोली- उत्तर गडचिरोली भागातील तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे उत्तर गडचिरोली भागात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम असून गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-हैदराबाद, आष्टी-चंद्रपूर या राष्ट्रीय मार्गासह प्रमुख बारा मार्ग बंद आहेत.
१३ व १४ ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरला असून उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा व गडचिरोली तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे १२ ऑगस्टला दुपारनंतर तब्बल १० प्रमुख मार्ग बंद झाले. तर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गडचिरोली-नागपूर या मार्गासह अल्लापल्ली-भामरागड हा मार्ग बंद झाला. त्यामुळे यावर्षी चौथ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदी पुलावर पाणी चढल्याने आष्टी-चंद्रपूर हा मार्गही बंद झाला आहे.
दरम्यान, गडचिरोली शहरातील अनेक घरांमध्ये काल (मंगळवार) पाणी शिरले होते. आता काही प्रमाणात पाणी ओसरले आहे. तर चातगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा 'शोधग्राम सर्च' प्रकल्पही पाण्याखाली गेला होता. आज सकाळी येथील पूर्ण पाणी ओसरला आहे. तरीही डुम्मी-जवेली, गडचिरोली-धानोरा, गडचिरोली-चामोर्शी, खरपुडी-दिभना, मुरखडा-वाकडी, मौशीखांब- वडदा, कुरखेडा-वैरागड, मालेवाडा-पिसेवाडा, विश्रामपूर-गोगाव, तळोधी-आमगाव, फरी-अरततोंडी हे मार्ग बंद आहेत.