गडचिरोली- सिरोंचा येथील शासकीय वसतिगृहात गेल्या ८ दिवसापासून अळ्यायुक्त जेवण दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे विद्यार्थिनी संतप्त झाल्या होत्या. निवेदन देऊनही प्रशासनाने समस्या सोडवली नाही. तसेच वसतिगृहात महिला अधीक्षकाची नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या १०० विद्यार्थिनींनी आज शनिवारी येथील शासकीय आश्रमशाळेला रामराम ठोकला.
सिरोंचामधील 'त्या' १०० विद्यार्थिनींचा शासकीय आश्रमशाळेला अखेर रामराम
सद्य:स्थितीत या शाळेत १७८ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र, सत्राच्या सुरुवातीपासूनच येथे महिला अधीक्षक तसेच महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे याठिकाणी विद्यार्थिंनीच्या आरोग्याचा कुणीही काळजीवाहक नव्हता
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे सिरोंचा येथे २०१३ मध्ये अनुसूचीत जातीच्या (नवबौद्ध) मुलींची निवासी शाळा सुरू करण्यात आली. सद्य:स्थितीत या शाळेत १७८ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र, सत्राच्या सुरुवातीपासूनच येथे महिला अधीक्षक तसेच महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे याठिकाणी विद्यार्थिंनीच्या आरोग्याचा कुणीही काळजीवाहक नव्हता. यासंदर्भात विद्यार्थिनींनी १० दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन दिले होते. त्याद्वारे त्यांनी १० दिवसात अधीक्षिका अथवा महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. नियुक्ती न झाल्यास सर्व विद्यार्थिनी सामूहिकरित्या शाळा सोडतील, असा इशारा देखील दिला होता. मात्र, सामाजिक न्याय विभागाने दखल न घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थिंनींनी आज आपल्या पालकांना बोलावून मुख्याध्यापकांना निवेदन दिले. त्यानंतर सर्वांनी शाळेला रामराम ठोकला.
दरम्यान, काही विद्यार्थिनींचे पालक रविवारी शाळेत येऊन त्यांनाही शाळेतून घरी घेऊन जाणार आहेत. गेल्या आठवड्यात याच शाळेतील भोजनात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली होती. आता अधीक्षिकाच नसल्याने विद्यार्थिंनींच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थिनींवर शाळा सोडण्याची पाळी आल्याने सामाजिक न्याय विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोबतच ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा नाराही व्यर्थ ठरत आहे.