धुळे- वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळत आहे. गेल्या अनेक वर्षात पोलीस भरती करण्यात आलेली नाही, यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. बेरोजगारी कमी व्हावी यासाठी शासनाने मेगाभरती करून तरुणांच्या हाताला काम मिळवून द्यावे, पोलीस दलातील रिक्त जागा व नवीन पोलीस शिपाई पदसंख्या एकूण 40 हजार पोलीस भरती करावी यासह विविध मागण्यांसाठी युवासेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
राज्यातील वाढत्या बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणात तरूण युवकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. युवकांच्या हाताला रोजगार नसल्या कारणाने अनेक समस्यांना आजच्या युवकांना सामोरे जावे लागते आहे. बेरोजगारी ही आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशासमोरील महत्वाचे आव्हान आहे. आज पोलीस भरती व इतर शासकीय जागांच्या रिक्त पदांची भरती होत नसल्या कारणामुळे तरुण मोठ्या प्रमाणात वयोमर्यादेच्या बाहेर जात आहे.
बेरोजगारीविरोधात युवासेनेचा धुळ्यात आक्रोश मोर्चा आज युवक-युवती शैक्षणिक कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण करीत आहे. परंतु, शासकीय किंवा इतर क्षेत्रात नोकरी उपलब्ध नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात रोजगार तरुणांसाठी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस खालवतो आहे. त्याचे परिणाम गुन्हेगारी, अवैध धंदे, युवकांची आत्महत्या अशा अनेक समस्यांना तरूण पिढी सामोरे जात आहे. या बेरोजगारीच्या विरोधात युवासेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
2011 ते 2019 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील बाकी असलेल्या पोलीस दलातील रिक्त जागा व नवीन पोलीस शिपाई पदसंख्या एकूण 40 हजार पोलीस भरती करावी. पोलीस भरती प्रक्रीया राबवित असताना सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी राबविण्यात यावी. लवकरात लवकर जम्बो पोलीस भरतीचे आयोजन करावे, राज्यातील सर्व शासकीय कार्यालय जेथे आज हजारोंच्या संख्येने रिक्त पदे आहेत ते ताबडतोब भरण्यात यावीत. पोलीस भरती किंवा सर्वच प्रकारच्या शासकीय परिक्षांचा निकाल लवकरात लवकर जाहिर करण्यात यावा. अश्या मागण्या या मोर्च्याच्या माध्यमातून युवासेनेच्या वतीने करण्यात आल्या. शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन भरती प्रक्रिया राबवली नाही तर युवासेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.