धुळे - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची शुक्रवारी (१९ एप्रिल) होणारी सभा काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आली आहे. ही सभा पुढे ढकलण्यात आली असून सभेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
योगी आदित्यनाथ यांची धुळ्यातील सभा रद्द - सुभाष भामरे
योगी आदित्यनाथ यांची शुक्रवारी होणारी सभा काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदार संघात भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ योगींची शुक्रवारी शहरात सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, योगींवर निवडणूक आयोगाने कारवाई करत त्यांना ७२ तास प्रचाराला बंदी केली होती. बंदी उठल्यानंतर त्यांची महाराष्ट्रात सभा होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ही सभा पुढे ढकलण्यात आली असून सभेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
योगींची सभा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. ही सभा कधी होते आणि ते सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.