धुळे - सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्याची इंग्रजी नमुना वर्षाप्रमाणे 31 डिसेंबरला प्रथा आहे. मात्र, जाणारे वर्ष बरेच काही देऊन जाते. येणारे नवीन वर्ष अनेक अपेक्षा घेऊन येत असते. यातीलच 2021 या वर्षातील धुळे जिल्ह्यातील काही ठराविक घटनांचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.
- मुंबई-आग्रा महामार्गावर दिर आणि भावजयीचा धिंगाणा : मुंबई आग्रा महामार्गावर मद्यधुंद दिर आणि भाऊजाई यांनी चांगलाच धिंगाणा घातला. विचारपूस करायला गेलेल्या पोलिसांना महिलेने धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ देखील केली. नरडाणा पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित महिलाही मद्यधुंद असल्याने पोलिसांनी संयमाने घेत, गुन्हा दाखल करून न्यायालयात या दोघांना हजर राहायला सांगितले होते. मात्र, संबंधित महिलेने पोलिसांना त्याही ठिकाणी त्रास दिला. या प्रकारामुळे भावजय आणि दिरांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. पोलिसांनी दाखवालेल्या संयमी भूमिकेचं कौतुक तेव्हा करण्यात आले होते. संबंधित महिला पोलिसांसोबत बेशिस्त वर्तन करत असताना, पोलीस मात्र तिला संयमाने वागणूक देत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये चित्रित झाले होते.
- दोंडाईडाचा येथे विचित्र घटना क्रमात एकाची हत्या :1 एप्रिल 2021 शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोन विशिष्ट समुहात तुफान राडा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना सोडवण्यासाठी जमा पोलीस स्टेशनवर चालून आला होता. त्यावेळी ज्ञानेश्वर वारे या पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा वाद झाला आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोंडाईचा शहरामध्ये आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाला होते. परिस्थिती व्यवस्थित हाताळली गेली नसल्यामुळे तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
- सामोडे गावात मृतदेहाची विटंबना :साक्री तालुक्यातील सामोडे या गावांमध्ये एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र, या मृत व्यक्तीचे शव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी शववाहिनी मिळत नव्हती. शव वाहिनी मिळत नसल्याने मृतदेह अनेक तास घरासमोर पडून होता. अखेर नाईलाजास्तव सामोडे येथील काही जबाबदार नागरिकांनी त्या व्यक्तीचा मृतदेह गावात कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीमध्ये टाकून अंत्यविधीसाठी नेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली गेली होती. मृतदेहाची अशी विटंबना होऊ नये, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, आरोग्य विभागावर टीकेची झोड उठली होती. याघटनेची दखल घेत आरोग्य विभागाने तत्काळ पावले उचलली होती.
- करोनाची लागण झालेल्या नवजात अर्भकावर उपचार :देशभरात कोरोनाने चांगलाच थैमान घातले. ज्येष्ठांनपासून ते लहानांपर्यंत सगळ्यांचा आपल्या विळख्यात घेतले होते. धुळ्यात अवघ्या दोन दिवसाच्या बालकालादेखील कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली. मात्र, या बालकावर धुळ्यातील बालरोगतज्ञ डॉ. अभिनव दरवडे यांनी उपचार करून त्याला कोरोना मुक्त केले होते.
- सर्वात जुन्या बाजारपेठेला आग : धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शंकर कापड मार्केटला आग करोडो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली होती. धुळे शहरातील ही सर्वात जुनी बाजारपेठ आहे. याठिकाणी शहरातील सिंदी बांधवांचे विविध होलसेल कापड दुकाने आहेत. मात्र, अचानक आग लागल्यामुळे या आगीत सात दुकाने जळून खाक झाली होती. कोट्यावधी रुपयांचे नुकसान त्यात झाले होते. या बाजारपेठांमध्ये अरुंद रस्ते असल्याने आग विझवण्यासाठी यंत्रणेला प्रचंड कसरत करावी लागत होती. त्यानंतर आग विझवण्यासाठी अशा चिंचोळ्या जागेमध्ये विशेष काळजी घेण्याबाबत ही सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या आगीनंतर या बाजारपेठेतली भौगोलिक परिस्थिती फारशी बदललेली नाही.
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार :धुळ्यातील मोहाडी उपनगरातील 70 वर्षाच्या नराधमाने 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जनावरांसाठी चारा तोडून देतो, या बहाण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करून नराधमास मोहाडी पोलिसांनी गजाआड केले. या नराधमाला पोलिसांनी अटक केल्यानंतर, या प्रकरणात पुन्हा एक धक्कादायक बाब समोर आली. हा 70 वर्षाचा थेरडा मुलीवर अत्याचार करत असताना, त्याचं चित्रीकरण दोन मुलांनी करून घेतलं होते आणि या मुलांनी हे चित्रीकरण समाज माध्यमांवर व्हायरल केले होते. मुलीवर होत असलेले अत्याचार थांबवण्या ऐवजी या मुलांनी त्याचे चित्रीकरण केले. त्यावेळी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला गेला होता. पोलिसांनी या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली होती.
- एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन :राज्यात एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनात धुळे जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी विविध लक्षवेधी आंदोलन केलीत. याच दरम्यान एका व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी मृत कर्मचाऱ्याचे शव विभागीय नियंत्रक कार्यालयात आणून ठेवले होते. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर या कर्मचाऱ्याचा मृतदेह घरी नेण्यात आला.
- आर्यन खान ड्रग प्रकरणात धुळ्यातून धक्कादायक खुलासे :आर्यन खान ड्रगज प्रकरण खूप गाजत असताना या प्रकरणात धुळ्यातून धक्कादायक खुलासे झाले. या प्रकरणातील एक संशयित सुनील पाटील हा धुळ्यातील रहिवासी निघाला. त्याच्या सोबत असलेला विजय पगार याने मुंबई पोलिसांना धक्कादायक जबाब दिला. यात पगारे यांनी सुनील पाटील यांचा आर्यन खान प्रकरणात कसा संबंध आहे? हे जगजाहीर केले. पगारे यांच्या खुलास्यानंतर पाटील यांना पळता भुई थोडी झाली होती. त्यानंतर पाटील यांनी स्वतः पत्रकारांसमोर जात आपली भूमिका मांडली होती. पाटील यांच्या धुळ्यातील घरावरती ही पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र, त्यांचा या ठिकाणी कुठलाही ठावठिकाणा नव्हता.
- कैद्यांसाठी पहाट पहावा :दिवाळी निमित्ताने धुळे जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी पर्वणी ठरली. ती म्हणजे पहाट पाडव्याची मैफिल. कारागृहातील कैद्यांना प्रत्येक दिवस हा सारखा जातो. मात्र, त्यांच्या आयुष्यामध्ये दिवाळी सण येतो. मात्र, तो कारागृहात सर्वसामान्य दिवसांसारखाच राहतो. कार्यालय कारागृह अधीक्षक गायकवाड यांनी यावर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करून कैद्यांना दिवाळीची चांगली पर्वणी दिली.