धुळे- जिल्ह्यात यंदा थंडीचा पारा चांगलाच घसरल्याने तुरीचे पीक उत्तम आले आहे. धुळे तालुक्यात सध्या तूर काढण्याचे काम सुरू आहे. या तुरीला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंत्राच्या साहाय्याने हे काम करण्यात येत असल्याने सध्या शेतकऱ्यांनी तूर काढण्याच्या कामाला चांगलाच वेग दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धुळ्यात तूर काढण्याच्या कामाला वेग - शेतकरी
यंदा संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा पारा चांगलाच घसरल्याने त्रासदायक वाटणारी थंडी मात्र पिकांसाठी अतिशय उत्तम ठरली. या थंडीचा फायदा गहू आणि तुरीला झाला. यंदा तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर आल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.
तूर काढताना शेतकरी
शहरासह परिसरात पुन्हा थंडीची हुडहुडी वाढली आहे. येत्या काही दिवसात पारा घसरून गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तूर काढून घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल या भावाने तुरीची विक्री झाली होती. मात्र, यंदा दुष्काळाची परिस्थिती पाहता किमान ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.