धुळे -पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी धुळे रुग्णालयातून ७० किमी पायी चालत घराकडे रवाना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच दिवसापासून ही महिला रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र, महिलेकडे कोणीही लक्ष दिले नाही. तसेच तिची तपासणी देखील झाली नाही. या महिलेच्या पॉझिटिव्ह पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने संतापून गावाची वाट धरली. यामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला.
धक्कादायक..! कोरोनाबाधित पतीचा मृत्यू, अंत्यविधीनंतर हतबल महिलेची ७० किमी पायपीट - धुळे कोरोना अपडेट
पतीचा मृत्यू झाल्याने महिलेची चिंता वाढली. तिचे साधे स्वॅब देखील घेतले नसल्याचे सांगितले जात आहे. कोणीही लक्ष देत नसल्यामुळे अखेर तिने २६ मे रोजी सकाळच्या सुमारास घराचा रस्ता धरला. रखरखत्या उन्हात ७० किलोमीटर पायी चालत सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिरपूर चोपडा रस्त्याजवळील सुतगिरणीजवळ नातेवाईकांना ती दिसली.
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल २२ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्या व्यक्तीला भाटपुरा येथून आरोग्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून धुळ्याला रवाना केले होते. मात्र, त्यावेळी जवळचा संपर्क म्हणून त्या पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत त्याच्या पत्नीला देखील त्याच रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले होते. पतीला कोरोनाची लागण झाली होती. आपला अहवाल काय येतो? या चिंतेत ही महिला होती. मात्र, तिच्याकडे रुग्णालयातील कोणीही लक्ष दिले नाही. अखेर २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास तिच्या पतीचा मृत्यू झाला. मृतदेह दिवसभर रुग्णालयात पडून होता. माणसे नसल्यामुळे अंत्यसंस्कार आता होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर शिरपूर येथील तहसीलदारांना दोन व्यक्तींना सोबत घेऊन धुळे येथे त्या महिलेच्या पतीवर अंत्यसंस्कार केले.
पतीचा मृत्यू झाल्याने महिलेची चिंता वाढली. तिचे साधे स्वॅब देखील घेतले नसल्याचे सांगितले जात आहे. कोणीही लक्ष देत नसल्यामुळे अखेर तिने २६ मे रोजी सकाळच्या सुमारास घराचा रस्ता धरला. रखरखत्या उन्हात ७० किलोमीटर पायी चालत सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिरपूर चोपडा रस्त्याजवळील सुतगिरणीजवळ नातेवाईकांना ती दिसली. नातेवाईकांनी तत्काळ भाटपुरा येथील सरपंच आणि सद्स्यांना संपर्क साधत माहिती दिली. त्यानंतर सरपंच शैलेंद्र चौधरी व सदस्य रोशन सोनवणे सुतगिरणीजवळ पोहोचले. त्यांना संपूर्ण घटनेची माहिती त्या महिलेकडून जाणून घेतली. त्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्याचे सचिन साळुंखे, तहसीलदार आबा महाजन, तालुका अधिकारी प्रसन्न कुलकर्णी आदी पोहोचले. त्यांनी विचारपूस केली असता, महिलेने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तिला शिरपूर येथील शिंगावे कोव्हिड सेंटरमध्ये रवाना करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यापूर्वी देखील धुळे जिल्हा रुग्णालयातून अर्थे येथील दाम्पत्य विनातपासणी शिरपूर येथे परतल्याचा प्रकार समोर आला होता. आता ही महिला पाच दिवस रुग्णालयात राहून स्वॅब चाचणी न घेतल्याने पायपीट करत घरी परतली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.