धुळे -वीज कंपनीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोमवारी सकाळी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे वीज कंपनीविरुध्द संतापाची लाट उसळली असून कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील जय शंकर कॉलनी लगत विजय हौसिंग सोसायटी असून तेथे प्लॉट नं. ९ ब मध्ये आशा राजेंद्र येवले (वय ४८) या राहतात. सकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या परिसरातून घंटागाडी जात असल्याने कचरा टाकण्याठी बाहेर आल्या. घंटागाडीत कचरा टाकून घराकडे जात असताना वीज तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. वीजेच्या तिव्र धक्क्याने त्या जागीच मृत्यू झाला.
तक्रार करूनही रात्री वायरमन फिरकलेच नाही, सकाळी वीज तार पडून महिलेचा बळी
वीज तार पडून महिलेचा बळी गेल्याची घटना धुळ्यात घडली आहे. याबाबत तक्रार करूनही वायरमन फिरकलेच नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
जय शंकर कॉलनी आणि परिसरात गेल्या सहा महिन्यांपूर्वी लोंबकळणाऱ्या वीज तारा काढून तेथे केबल टाकण्यात आली होती. फक्त येवले यांच्या परिसरातील पोल नं. एफ. ४४ ८, ९ आणि १० या ३ खांबावरच वीज तारा होत्या. या वीज तारा बदलून तेथे देखील केबल टाकण्यात यावी याबाबत वारंवार वीज कंपनीकडे तक्रार करण्यात आली होती. तौक्ते वादळाचा साईड इफेक्ट धुळ्यातही रविवारपासून जाणवत आहे. वादळी वारे वाहत आहे. या वाऱ्यांमुळे येवले यांच्या घराजवळील वीज तारमध्ये ठिणग्या झडत होत्या. वीज तार केव्हाही तुटू शकते. हे ध्यानात घेवून स्थानिकांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अनेकवेळा फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलाच नाही. त्यामुळे काहींनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी माणुस पाठवतो असे सांगितले. मात्र, प्रत्यक्ष कोणताही कर्मचारी आला नाही असे स्थानिकांनी सांगितले. रविवारी रात्री अथवा आज सकाळी लवकर स्पार्कींग होत असलेल्या वीज तारेचा बंदोबस्त केला असता तर वीज तार कोसळून येवले यांना जीव गमवावा लागला नसता, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. एमएसईबीच्या भोंगळ कारभाराचा फटका एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. वीज कंपनीमुळे महिलेचा नाहक बळी गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भरपाईची मागणी करत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
आशा येवले या फळ विक्रेते राजेंद्र दत्तात्रय येवले यांच्या धर्मपत्नी होत्या. २००८ च्या महापालिका निवडणुकीत त्या भाजपकडून उमेदवार होत्या. त्यावेळी अवघ्या ७ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. येवले यांच्या पश्चात आजेसासू, सासू, पती, दोन मुली, एक मुलगा, दोन दीरअसा परिवार आहे.