धुळे - आगामी विधानसभा निवडणूकीत जो पक्ष मला कॅबिनेट मंत्रीपद देईल, त्याच पक्षाकडून उमेदवारी करणार असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'मंत्रिपद' देणार तिकडूनच लढणार - अनिल गोटे हेही वाचा - धुळे जिल्ह्यात काँग्रेसला पडणार खिंडार? हे 'दोन' आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा
पुढे बोलताना गोटे म्हणाले, धुळे शहरातून मला ७० टक्के नागरिकांची पसंती आहे. धुळे शहराच्या झालेल्या सर्व्हेमध्ये आजही माझा पहिला क्रमांक आहे. सगळ्या राजकीय पक्षांकडून मला उमेदवारीबाबत विचारणा झाली आहे. मात्र, कोणत्याही पक्षाकडून आमदार होणे हे मला पसंत नाही. जो पक्ष मला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षाकडून आपण लढू, असे त्यांनी सांगितले. तर मंत्री झाल्यावर येत्या 5 वर्षात सफारी गार्डन, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यावर भर राहील असेही त्यांनी सांगितले. रावेरमधील 1707 एकर सरकारी जमिनीवर वेगवेगळे उद्योग आणून चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण लोकसंग्राम पक्षाकडून लढण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - काशीराम पावरा यांच्या हाती कमळ, जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार
येत्या ४ तारखेला आपण लोकसंग्राम या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करणार आहोत. शिवसेनेसोबत आपली बैठक झाली आहे. मंत्रिपदाबाबत आपण मुदत दिली आहे. त्या मुदतीत मला आश्वासन देण्यात आल्यास आपण उमेदवारी करू, हे सांगताना अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या प्रवेशाचे संकेत दिले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर आता अनिल गोटे हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.