धुळे- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील धुळे मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळच्या सत्रामध्ये मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. मात्र, दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला.
धुळ्यात उन्हाचा पारा वाढला; मतदान थंडावले
आज दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार धुळे मतदारसंघात एकूण ४०.६३ टक्के एवढे मतदान झाले आहे.
धुळे शहरासह ग्रामीण भागातदेखील आज सकाळच्या सुमारास मतदानाला चांगला प्रतिसाद दिसून आला. मालेगाव आणि सटाणा विधानसभा मतदारसंघातदेखील सकाळी नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. मात्र दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट आढळून आला.
वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंद केल्याने मतदान केंद्रांवर शांतता होती. मात्र नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धुळे मतदारसंघात युतीकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि आघाडीकडून कुणाल पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. आज दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार धुळे मतदारसंघात एकूण ४०.६३ टक्के एवढे मतदान झाले आहे.