धुळे- नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डॉ. सुभाष भामरे यांच्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. या संबंधामुळे आपण कोणताही स्वार्थ मनात न ठेवता भाजपचे काम करु. आजही मोदींच्या कामाचा ग्रामीण भागात प्रभाव आहे. त्यामुळे धुळे लोकसभा मतदार संघातून डॉ. सुभाष भामरे विजयी होतील, असा विश्वास उत्कर्ष पाटील यांनी व्यक्त केला.
कोणताही स्वार्थ मनात न ठेवता भाजपचे काम करणार - उत्कर्ष पाटील
नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचे चुलत भाऊ उत्कर्ष पाटील यांच्याशी ईटीव्ही भारतचे धुळे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी संवाद साधला. उत्कर्ष पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. उत्कर्ष पाटील यांनी आपल्या भावाच्या विरोधात धुळे लोकसभा मतदार संघात प्रचार सुरु केला यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, २०१४ सालापासून मला भाजपमध्ये जायचे होते. मात्र, त्यावेळी काही कारणांमुळे मी थांबलो. शेवटी कुटुंबातील राजकीय मतभेदातून आपण हा निर्णय घेतला. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता मी भाजपचे काम करणार आहे. धुळ्यात स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती दरी दूर करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आपली लढाई ही कुणाल पाटील यांच्या विरोधात नसून फक्त भाजपचे काम करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.