धुळे - सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात बेरोजगार युवकांची नोंदणी केली जाते. धुळे जिल्ह्यातील ९३ हजार ५६५ बेरोजगार युवकांनी मे २०१९ अखेर कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केलीआहे. तर जवळपास ८० हजार तरुणांना रोजगाराची प्रतीक्षा लागून आहे. यामुळे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
धुळे जिल्ह्यातील ९३ हजार ५६५ बेरोजगार युवकांची नोंदणी शिक्षण घेऊन उत्तम पगाराची नोकरी मिळविणे हे प्रत्येकाचे ध्येय असते. मात्र शिक्षण असून देखील मनासारखी नोकरी किंवा रोजगार मिळत नसल्याने नैराश्य येते. शासकीय नोकरीत यश न मिळाल्यास अनेक तरुण आता उद्योगाकडे वळत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर धुळे शहरासारख्या जिल्ह्यात अपेक्षित रोजगार मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांची पाऊले मुंबई पुण्याच्या दिशेने वळत आहेत. शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची नोंदणी होत आहे. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात धुळे जिल्ह्यातील ९३ हजार ५६५ बेरोजगार युवकांनी मे २०१९ अखेर नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.
धुळे जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. तालुकास्तरावर कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मेळावे घेऊन देखील त्यामाध्यमातून बेरोजगारी कमी झालेली दिसत नाही. धुळे जिल्ह्यातील जवळपास ८० हजार तरुणांना रोजगाराची प्रतीक्षा लागून आहे. गेल्या ८ वर्षांपूर्वी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी केलेल्या युवकांना शासकीय, निमशासकीय खात्यात जागा रिक्त झाल्या कि रोजगार मिळण्यासाठी नोकरी उपलब्ध करून दिली जाते. २०१२ पासून या विभागाचे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे नामकरण करण्यात आले आहे.
ऑनलाईन नोंदणी केली जाते मात्र रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही. तसेच कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मुंबई-पुणे या शहरांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावा सरकारमार्फत केला जातो. मात्र तरी देखील बेरोजगारी कमी न झाल्याने या शहरांमध्ये तरुणांचे स्थलांतर होत आहे. धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.