धुळे- जिल्ह्यात कोरोना बधितांच्या संख्येत सोमवारी (दि. 15 जून) 12 जणांची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 420 झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला असून 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील सहा दिवसांत शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढला असून आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढली आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि. 15 जून) रात्री उशिरा तब्बल बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 420 झाली आहे. आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला असून 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात मागील सहा दिवसांत शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तब्बल 13 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 8 जूनपर्यंत कोरोनाबाधित मृतांची संख्या 25 होती. त्यानंतर 9 जून रोजी देवपुरातील एका तरुणाचा मृत्यू झाला. मात्र गेल्या सहा दिवसांत मृतांची संख्या 26 वरून थेट 42 वर पोहोचली आहे.
धुळे शहरात मृत्यूदर अधिक होता. मात्र, सध्या ग्रामीण भागातील मृत्यूदरात वाढ झाली आहे. गेल्या सहा दिवसांत धुळे ग्रामीणमध्ये 53 नवीन रुग्ण आढळले असून त्यात 32 नवीन रुग्ण हे शिरपूर शहरातील आहेत. शिरपूर शहरात 47 रुग्ण झाले आहे. जिल्ह्यात टाळेबंदीत शिथिलता आल्यापासून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह ग्रामीण भागात शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 50.61 टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टीव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात सोमवारी (15 जून) 5 हजार 71 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 56 हजार 49 झाली आहे. सोमवारी 2 हजार 786 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात 50 हजार 554 अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा -धुळ्यात अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी दोघांना अटक; पोलिसांनी 24 तासांत लावला छडा