धुळे - महामार्गावर रात्रीच्या अंधारात ट्रकचालकांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रकमेसह मुद्देमाल लुटणाऱ्या दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले आहे. तर यातील अन्य दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
धुळ्यात ट्रक लूटमारीतील दोघे ताब्यात; अन्य दोघांचा शोध सुरु
रात्रीच्या अंधारात ट्रकचालकांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रकमेसह मुद्देमाल लुटणाऱ्या दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले आहे. तर यातील अन्य दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
साक्री रोडवरील मोराने शिवारात ट्रक चालकास मारहाण करत १५ हजार रोख रुपयांसह लाखोंचा गुटखा चारचाकी वाहनातून आलेल्या तिघांनी लुटून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत संशयित भूषण सुर्वेसह एकाला ताब्यात घेत त्यांच्याकडून लुटीदरम्यान वापरलेले वाहन व गुटखा हस्तगत केला आहे. गुन्ह्यातील संशयित अमित पवारसह एकाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शहरालगत साक्री रोडवरील मोराने शिवारात २४ सप्टेंबरला रात्री स्विफ्ट कारमधून आलेल्या अज्ञात तिघांनी ट्रक चालकास मारहाण करत खिशातील १५ हजार रुपये व ट्रक मधील लाखोंचा गुटखा लुटून नेला होता. याप्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत यात भूषण उर्फ भुऱ्या सुर्वे याचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यास ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीदरम्यान सलमान रफिक शहा व समीर सलीम शेख सह अमित मारुती पवार हे सहभागी असल्याचे समोर आले. पोलिसांनी भूषण सुर्वे याच्या भाईजी नगर येथील घराची झडती घेतली असता धारदार शस्त्र, लुटीतील गुटखा, गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट कार व गुटखा पळवण्यासाठी वापरलेला ट्र्क असा एकूण ४ लाख ५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी फरार सलमान रफिक शेख यास हुडकून काढत ताब्यात घेतले असून यातील संशयित अमित मारुती पवार व समीर सलीम शेख यांचा शोध सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांनी दिली. सदर संशयितांकडून तपासादरम्यान इतरही गुन्ह्यांची उकल होणार असल्याबाबत सांगितले.
संशयित वाहनातून गावठी पिस्टल ताब्यात...
शिरपूर येथे बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचारसभेसाठी लावलेल्या बंदोबस्त दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्यावर तपासणी करत होते. यावेळी महामार्गावर संशयित वाहन रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव येताना दिसले. पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करत त्यास ताब्यात घेतले. वाहनातील एकाने पोलीस आल्याचे पाहत पळ काढला. तर अन्य चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे व मिरचीपुडसह नायलॉन दोरी आढळून आली. चौघांचा दरोड्याचा उद्देश स्थानिक गुन्हे शाखेने हाणून पडला असून शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.