धुळे -धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गावठी कट्ट्यासह टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्याला तसे त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. आत्तापर्यंत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या महिन्याभरात नऊ गावठी कट्टे जप्त केले असून हे धुळे शहरात कुठून येतात याचा तपास पोलीस करीत आहेत.
धुळे शहरासह जिल्ह्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. अवैध धंद्यांविरुद्ध तसेच अवैध शस्त्र बाळगण्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून गावठी कट्ट्यासह टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्याला धुळे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. धुळे शहरातील दीपक शिरसाट याने टिकटॉकवर गावठी कट्ट्यासोबत एक व्हिडिओ तयार केला होता. तो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या अन्य 2 साथीदार अभय अमृतसागर आणि पंकज जिसेजा यांचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडूनही एक गावठी कट्टा जप्त केला आहे. यात तीन जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. या तिन्ही आरोपींनी गावठी पिस्तूल कुठून आणल्यात आणि या माध्यमातून काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.