धुळे :दोघांनी धुळे जिल्ह्यातील बोरीस येथील प्रसिद्ध सती देवी मंदिराची दानपेटी फोडून रक्कम चोरल्याची कबुली दिली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील मंदिरांच्या दानपेटींसह इतर चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिले तपासाचे आदेश :धुळे तालुक्यातील बोरीस येथील सतीदेवी मंदिरामध्ये ४ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. दानपेटीतील रक्कम अज्ञात इसमांनी चोरी केल्याचे मंदिराचे व्यवस्थापक प्रसाद भीमराव पाटील यांच्या तक्रारीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी या गुन्ह्याची त्वरित उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिले होते. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना हा गुन्हा मुकेश वासकले व भुरेलाल सोलंकी (दोन्ही रा. वाक्या, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांनी केला असल्याची माहिती मिळाली. या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला तात्काळ मध्यप्रदेश राज्यात रवाना करण्यात आले. पोलीस पथक वाक्या गावात जाऊन आरोपींचा शोध घेत असताना आरोपींनी पळ काढला. अखेर पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले.