धुळे - जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्याला पोलिसांच्या गस्ती पथकाने रंगेहात अटक केली आह. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्याने यापूर्वीही एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबूली पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिली आहे. अशोक जगन बागुल (रा. धंदारणे, ता. शिंदखेडा) असे या चोरट्याचे नाव आहे.
दोंडाईचा शहरातील शिवाजी रोडवरील जैन मंदिरशेजारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास एक चोरटा एटीएममध्ये घुसून कुऱ्हाडीच्या सहाय्याने मशीनची तोडफोड करीत होता. नेमकं त्याचवेळी दोंडाईचा पोलिसांचे गस्तीपथक गस्त घालत असताना त्यांना एटीएममध्ये संशयितरित्या हालचाली होताना दिसल्या. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता, हा चोरटा तोंडाला काळा रुमाल बांधून कुऱ्हाडीच्या साह्याने एटीएम तोडण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांच्या पथकाने अशोक बागुल या चोरट्याला अटक केली. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापकीय प्रवीण सिताराम गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.