धुळे - कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मात्र धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आलेल्या शिक्षकांच्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडवला होता. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घटनास्थळावरुन आढावा घेताना आमचे प्रतिनिधी धनंजय दिक्षीत... मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. ही तपासणी करून घेण्यासाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हा रुग्णालय आवारात प्रचंड गर्दी केली होती.
गंभीर बाब म्हणजे यावेळी शिक्षकांची तपासणी करण्यासाठी होणारी गर्दी टाळावी, यासाठी कोणत्याही उपाययोजना जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नव्हत्या. शिक्षकांच्या झालेल्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. तसेच या वेळी अनेकांनी मास्कचा वापर केलेला नव्हता. यामुळे येत्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिक्षकांनी व्यक्त केला रोष
एकीकडे इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जात असताना दुसरीकडे मात्र प्रशासन शिक्षकांच्या जीवाशी खेळत असून तपासणीच्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने यावेळी आलेल्या शिक्षकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
हेही वाचा -धुळे : लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
हेही वाचा -विधान परिषद निवडणूक : धुळ्यात भाजपाचे पारडे जड; खडसे आणि गोटे यांचा कस लागणार...