धुळे :जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथील एका लहान व्यावसायिकाचे धुळे शहरात रोज येणे-जाणे आहे. कामानिमित्त येणाऱ्या वाहन चालकाला धुळे शहरात बारा पत्थर चौकात नेहमीच अडविले जात होते. ऑनलाइन मोठ्या रक्कमेचा दंड आकारण्याची धमकी देऊन वाहतूक पोलीस त्यांच्याकडून कधी २०० तर कधी ५०० रूपये तडजोडीची रक्कम वसूल करत होते. वाहतूक पोलिसांच्या या नेहमीच्या जाचाला हा वाहनचालक कंटाळला होता. वाहतूक पोलिसांच्या ड्युटी सतत बदलत असतात. बारा पत्थर चौकात ३ हे रोजी उमेश दिनकर सूर्यवंशी या पोलीस कर्मचारीची ड्युटी होती. सदर वाहनचालक वारंवार दंड भरतो आहे, हे लक्षात आल्यावर उमेशची सूर्यवंशी याची हिम्मत वाढली. त्याने दंडाऐवजी त्याला लाचेची मागणी केली.
अशी घडविली अद्दल:संबंधित वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक आपल्याला आर्थिक आणि मानसिक त्रास देत असल्याने, त्रस्त वाहन चालकाने त्याला अद्दल घडविण्याचे ठरविले. आपल्याकडे पैसे नसल्याने पैसे घेऊन येतो असे सांगून सदर वाहनचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. तसेच एसीबीने सांगितल्याप्रमाणे तक्रारदार पैसे देण्यासाठी गेला. तोपर्यंत एसीबीने सापळा रचला होता. एक पोलीस कर्मचारी त्या वाहन चालकाच्या सोबत दिला. शहरातील बारा पत्थर परिसरात उमेश सूर्यवंशी हा नेहमीप्रमाणे उभा होता. उमेश सूर्यवंशीने त्या वाहन चलाकाला ओळखले आणि गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर उमेशने दोनशे रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे लाचेची मागणी उमेश सूर्यवंशी करत असल्याचे सिद्ध झाले. त्याच ठिकाणी २०० रुपयांची लाच स्वीकारताना उमेशला एसीबीने रंगेहात पकडले.