धुळे: पोलिसांनी सांगितले की, धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे रस्त्यावर पिंपरखेडा घाटात गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास हा खून झाला. यशवंत सुरेश बागुल यांची धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे शिवारात शेती आहे. शेतीसाठी गावात मजूर मिळत नसल्याने यशवंत बागुल त्यांची पत्नी आणि मुले मामांच्या घरी मुक्कामी थांबले होते. यशवंत बागुल हे त्यांच्या मामाचा मुलगा पंकज राजेंद्र मोहिते यांच्या मोटरसायकलीवर बसून सायंकाळी सात वाजता शेजारच्या पिंपरखेडा गावात मजुरांच्या शोधासाठी गेले होते. दोघेजण पिंपरखेड येथून उभंड नांद्रे गावाकडे परत येत असताना पिंपरखेड घाटामध्ये मोटरसायकलीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी 'अण्णा थांब' असा आवाज देऊन थांबविले. त्यानंतर यशवंत बागुल आणि ते दोघे अनोळखी इसम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन गप्पा मारत उभे होते.
अशाप्रकारे केला हल्ला:काही वेळातच एकाने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढले आणि गोळी झाडली. त्यामुळे यशवंत बागुल यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्या इसमाने चाकूने त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. हा भयावह प्रसंग पाहून पंकज मोहिते हा मोटरसायकलीने गावात निघून आला आणि घडलेली घटना त्याने घरी सांगितली. त्यानंतर सर्व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने यशवंत बागुल यांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री एक वाजेच्या सुमाराला डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मयत घोषित केले.