धुळे -जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील मोहन सदाशिव मराठे (वय-37, रा. संत कबीरदास नगर, दोंडाईचा) या तरुणास एका गुन्ह्यासंदर्भात दोंडाईचा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, सकाळी चौकशीसाठी गेलेल्या तरुणाचा रात्री मृतदेह आढळून आला. रात्री दोंडाईचा शहरालगत शहादा रस्त्यावर पीरबल्ली येथे संशयास्पदरित्या हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या योगेश धनगर खून प्रकरणानंतर दोंडाईचा येथील मोहन मराठे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना मोहनचा मृत्यू कसा झाला? त्याच्या शरीरावर वळ कसले? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांवर आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोहन मराठे या तरुणाला एका चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर रात्री त्याचा मृतदेह दोंडाईचा शहादा रस्त्यावरील पीरबल्ली याठिकाणी आढळून आला. मृत मोहनच्या मानेवर असलेले वळ आणि मारहाणीचे व्रण पाहून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालयात मृत मोहन मराठे यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू कसा झाला? असा प्रश्न मृताच्या कुटुंबीयांनी केला. सकाळी पोलिसांसोबत गेलेल्या मोहनचा संध्याकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याबाबतची माहिती मोहनच्या मित्रपरिवाराने पोलिसांना कळविली असता पोलिसांनी माहिती मिळवून देखील मोहनच्या मृत्युची तपासणी करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली नाही.