धुळे- जिल्ह्यातील दोंडाईचा येथील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वसतिगृह निरीक्षकाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी केली आहे.
धुळ्यात वसतिगृह निरीक्षकाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थीनीचा मृत्यू हेही वाचा-सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाची घोषणा
दोंडाईचा येथील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या भारती पावरा या 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची 19 तारखेला तब्येत बिघडली होती. याबाबत माहिती दिल्यानंतर तिला दोंडाईचा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याठिकाणी तिच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर तिला वसतिगृहात परत पाठवण्यात आले. मात्र, 21 तारखेला तिची सायंकाळी प्रकृती अधिक बिघडल्यानंतर डॉक्टरांनी तिला धुळे येथे नेण्यास सांगितले. मात्र, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने विद्यार्थीनीला खासगी वाहनाने धुळे येथे आणण्यात येत होते. मात्र, चिमठाणे गावाजवळ आल्यानंतर तिची प्रकृती अधिक बिघडल्याने चिमठाणे येथील शासकीय रुग्णालयात तिला उपचारार्थ दाखल करण्यात आले. याठिकाणी देखील रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्याच खासगी वाहनाने तिला धुळे येथे आणण्यात आले. धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा-२५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
विद्यार्थिनीच्या प्रकृतीबाबत वसतिगृह निरीक्षक महिलेने डॉक्टर आणि तिच्या पालकांना कोणतीही माहिती न दिल्याने या विद्यार्थिनीची प्रकृती अधिक बिघडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांनाही माहिती कळताच त्यांनी धुळ्याकडे धाव घेत वसतिगृह निरीक्षक महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पावरा यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच वसतीगृह निरीक्षक महिलेला धारेवर धरले. तुमच्या हलगर्जीपणामुळे संबंधित विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असल्याचे तुम्ही जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.