धुळे - शिरपूर तालुक्यात असलेल्या वाघाडी गावात एका रसायनाच्या कंपनीत बॉयलरचे स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १५ पेक्षा अधिक कामगारांचा जीव गेला तर ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या आपत्तीचे निवारण करण्यासाठी थेट राज्य आपत्ती निवारण दलाला पाचारण करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, कोणत्याही अत्याधुनिक साधनांशिवाय या दलाच्या जवानांनी आपली जीव धोक्यात घालून मदतकार्य पार पाडले.
या दुर्घटनेमुळे राज्य आपत्ती निवारण दल तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना मिळणाऱ्या यंत्रसामुग्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक जिल्हा प्रशासनाने दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून राज्य स्तरावरून मदत मागितली. त्यानुसार मंत्रालयातून राज्य आपत्ती निवारण दलाला कॉल देण्यात आला. हा कॉल मिळाल्यानंतर लगेचच राज्य आपत्ती निवारण दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु, या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्यामुळे बचावकार्यासाठी अजून दोन पथकांना पाचारण करण्यात आले. बॉयलरचे स्फोट झाल्याने कारखान्यात आग लागली होती. वायू गळती देखील सुरू झाली होती. त्यामुळे मदतकार्य करणाऱ्या पथकातील जवानांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. अत्याधुनिक यंत्रसामुग्री, वायू गळतीवेळी लागणारा खास ड्रेस नसल्याने या जवानांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. शासनाने आम्हाला किमान अत्याधुनिक यंत्रसामुग्री तरी पुरवली पाहिजे, अशी मागणी यावेळी या जवानांनी केली.