धुळे - शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज (शुक्रवार) शिवसेनेच्या धुळे शाखेच्यावतीने मुख्य कार्यालयात भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. ध्वजारोहण दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. तसेच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मास्क न लावल्याने सरकारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा शहरभर रंगली होती.
जून 19, हा दिवस शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आहे. या दिवसानिमित्त प्रत्येक जिल्हास्तरावर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी एकत्र येऊन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा आदेश पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. या आदेशानुसार धुळे शहर शिवसेना शाखेच्या वतीने मुख्य कार्यालयात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.