धुळे - शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या कालिकामाता मंदिराजवळ जितेंद्र शिवाजी मोरे या व्यक्तीचा खून झाला होता. या खुनाचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. याप्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
'त्या' खून प्रकरणातील आरोपींचा शोध... दोघांना अटक - धुळे बातमी
पांझरा नदी किनारी असलेल्या कालिकामाता मंदिर परिसरात गरुड कॉम्प्लेक्समधील कुरिअरचे काम करणाऱ्या जितेंद्रची हत्या झाली होती. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, 11 जुलैला मध्यरात्री 12 च्या सुमारास कमलाबाई शाळेजवळ काही मुलांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करत त्यांच्याकडील पैसे घेतले. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच मुलांच्या तक्रारीवरून आरोपींचे वर्णन पोलिसांनी नोंद केले. याद्वारे राहुल ऊर्फ सुनील घोडे (रा. दैठणकर नगर वाडीभोकर रोड) याला ताब्यात घेणात आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जितेंद्रची हत्या केल्याचीही कबुली राहुलने दिली आहे. जितेंद्रचा आम्ही मोबाईल, पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला यात जितेंद्रने विरोध केला असता त्याच्या डोक्यात दगड घातला असल्याचे राहुलने सांगितले.
तर, राहुलचा साथीदार हर्षल पाटील पळून जात होता. दरम्यान झालेल्या अपघात तो जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक, डॉ.राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने केली.