धुळे : शिरपूर तालुक्यातील सावरळदे गावातील मूळ रहिवासी असलेले रतिलाल मोरे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे चालक आहेत. ते आपल्या कुटुंबासह शिरपूर शहरात वरवाडे भागामध्ये भाडेतत्त्वाच्या घरात राहतात. वरवाडे भागात असलेल्या महादेव मंदिरामध्ये कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये सोमवारी सकाळी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर दिनेश रतिलाल मोरे आणि त्याचे तीन ते चार मित्र अरुणावती नदीमध्ये पोहण्यासाठी गेले. त्यानंतर दिनेश घरी परतलाच नाही.
वडिलांच्या हाती लागला मृतदेह: दुपारी उशिरापर्यंत दिनेश घरी आला नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. ज्या मित्रांसोबत तो गेला होता त्या मित्रांकडेही विचारपूस केली. मात्र, घाबरलेल्या मित्रांनी या घटनेबद्दल काहीही सांगितले नाही. संपूर्ण शिरपूर शहरासह सावळदे गावामध्ये दिनेशची शोधाशोध सुरू होती. सोशल मीडियावरही तो बेपत्ता झाल्याची पोस्ट शेअर करण्यात आली होती. दरम्यान, एका मुलाने नदीमध्ये पोहायला गेल्याची माहिती दिनेशच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी दिनेशचे वडील रतिलाल मोरे यांनी आपल्या काही मच्छीमार मित्रांना नदीमध्ये शोधाशोध करण्यासाठी बोलावले. नदीतील पाण्यामध्ये बराच काळ शोध मोहीम सुरू होती. दुर्दैवाची बाब म्हणजे पाण्यात शोध घेत असताना नदीतील गाळामध्ये अडकलेला दिनेशचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या हाती लागला आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला.