धुळे - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस ( Heavy Rain in Dhule ) सुरु असल्याने साक्री गावातील कान नदीला पूर ( Sakri Kan River Flood ) आला आहे. प्रशासनाच्या वतीने कान नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार प्रवीण चव्हाण हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय कुमार चव्हाण, नगरपंचायत अधिकारी देवेंद्र परदेशी यांनी परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना पुलावर जाण्यास बंदी केली आहे. तरी देखील काही नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला दुर्लक्षित करून पुलावर जात होते.
अनेक भागात झाडांची पडझड - साक्री - पिंपळनेर मार्गावरील कान नदीवरील पूल वाहतुकीसाठी काही वेळ बंद ठेवण्यात आला होता. साक्री शहर परिसरात काही ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्याने त्या भागातील रस्ते काही वेळ बंद होते. रस्त्यावर पडलेल्या वृक्षाच्या फांद्या हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.