धुळे- जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून तपास केला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षकाच्या बंद घरातून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. तर रविवारी (दि. 17 जाने.) मध्यरात्री चोरट्यांनी चक्क प्रातांधिकारी भिमराज दराडे यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.
शासकीय सदनिकेत दरोडा
धुळे शहरातील अंध शाळेसमोर शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थाने आहेत. या ठिकाणी प्रातांधिकारी भिमराज दराडे हे देखील शिवनेरी नावाच्या शासकीय सदनिकेतवास्तव्यास आहेत. मात्र, कौटुंबिक कामानिमित्त ते अहमदनगर येथे कुटूंबासह गेले होते. यामुळे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात असलेले काही ऐवज चोरुन नेला असल्याचे समोर आले आहे.
पंचनामा करुन गुन्हा दाखल
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दराडे यांच्या शेजारी राहणारे उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. तसेच या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.