धुळे - शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. शहरातील साक्री रोडवरील 2 ठिकाणी चोरट्यांनी आपला हात साफ केला. यात एका ठिकाणी चोरट्यांनी चक्क पोलिसांच्या घरालाच लक्ष केले. यामुळे शहरात वाढत्या चोऱ्यांकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शहरातील साक्री रोड भागात असलेल्या पुखराज रामकरण वर्मा यांच्या श्री सिद्धिविनायक ज्वेलर्स या दुकानातून चोरट्यांनी बेन्टेक्सचे दागिने आणि विविध राशींचे खडे असा ऐवज चोरून नेला. एवढेच नव्हे तर याठिकाणी राहणाऱ्या साई अपार्टमेंट मधील पोलीस कॉन्स्टेबल भिकाजी पाटील हे रात्री ड्युटी बजावण्यासाठी गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटाची तिजोरी फोडून तिजोरीतून 2 तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र, 5 ग्रॅम वजनाच्या 3 अंगठ्या, 2 ग्रॅमची सोन्याची पट्टी आणि 4 ग्रॅम वजनाची रिंग असा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरटे अपार्टमेंटमध्ये घुसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.