महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात भारत बंदला हिंसक वळण, दगडफेक करत वाहनांची तोडफोड - धुळ्यात वाहनांची तोडफोड

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशासह राज्यात आंदोलने सुरु आहे. धुळ्यात सुरु असलेल्या भारत बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शहरातील चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी रोड या भागात आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला.

Protest against CAA at Dhule
धुळ्यात भारत बंद आंदोलनाला हिंसक वळण

By

Published : Jan 29, 2020, 6:01 PM IST

धुळे - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशासह राज्यात आंदोलने सुरु आहे. धुळ्यात सुरु असलेल्या भारत बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शहरातील चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी रोड या भागात आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. यामुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात संमिश्र प्रतिसाद दिसून आला तर शहरातील मुस्लिम बहुल भागातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. एकीकडे शांततेत हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शिरपूर येथे आंदोलनकर्त्यांनी शिरपूर पानसेमल या बसची तोडफोड केल्याची घटना घडली. त्यानंतर धुळे शहरात या भारत बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. शहरातील चाळीसगाव रोडवरील पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शंभर फुटी रोड भागात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. यावेळी हिंदू मुस्लिम बांधव समोरासमोर आले असताना हे आंदोलन अधिकच चिघळले.

धुळ्यात भारत बंद आंदोलनाला हिंसक वळण

आंदोलनकर्त्यांनी या भागात दगडफेक सुरू केली. तसेच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीला पेटवून दिली. तसेच या ठिकाणी उभ्या असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या चारचाकी गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे हे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलन पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वाहतुकीस अडथळा निर्माण व्हावा, म्हणून रस्त्यावर मुरूम टाकला होता. दरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी या भागातील व्यवसायिकांची लहान दुकाने देखील रस्त्यावर उलटवली होती. दरम्यान, संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला धुळ्यात हिंसक वळण लागले आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध भागात तणावपूर्ण शांतता पसरली होती. सध्या शहराच्या विविध भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details