धुळे Prakash Ambedkar on Pm Modi: पंतप्रधानांचा सरपंच झाल्यावर आपण काय करणार, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर बोचरी टीका केली. केवळ चमकोगिरी केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अन्य कोणतेही काम नाही. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये देशातील जनतेने त्यांना घरी पाठवावे, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं.
मोदींवर केली टीका : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्या चेहऱ्यात एवढे अडकले की, त्यांना कुणाचाच चेहरा चालत नाही. आपले व्यक्तिमत्व इतर चेहऱ्यामुळे झाकले जाईल अशी भीती मोदींना वाटते. म्हणून ते फक्त स्वत:चाच चेहरा दाखवितात, अशी टीका 'वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केली.
मोदींनी स्वत:ची अवस्था सरपंचासारखी केली : आंबेडकर म्हणाले की, भाजपा स्वत:ला हिंदूंचे सरकार म्हणते. मात्र वर्षभरात एक लाख तेरा हजार हिंदुंनी देश सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. याबाबत मात्र, सनातन धर्माचे प्रचारक बोलत नाही. सनातन हेच हिंदुंना त्रास देतायेत. मोदींचा खोटा प्रचार आरएसएस करते. जी 20 परिषदेवर कोट्यावधीचा खर्च केला. यामागे मोदी हे देशाचेच नव्हे तर जगाचे नेते आहेत असा प्रचार करण्याचा हेतू होता. मात्र, मोदींची जो बायडेन यांनी चांगलीच फजिती केली. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, केजरीवाल विचारत असलेली डिग्री मोदी दाखवत नाहीत. यावरुन मोदींना इंग्रजी येत नाही याला पुष्टी मिळते. सत्तेसाठी भाजप समाजाला दुभंगत ठेवत आहेत. मोदींनी स्वत:ची अवस्था सरपंचासारखी केली आहे. गावात काहीही झाले की सरपंच म्हणतो मीच केले. तसे मोदी सरपंच झाले आहेत. मराठा समाज व आरक्षणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, निजामी मराठा रयतेच्या मराठा समाजाला स्वीकारत नाही हा एक जातीयवादच आहे.