धुळे- शहरातील देवपूर येथील जीटीपी स्टॉपजवळ असलेल्या विठ्ठल मंदिर परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळून एक गावठी कट्ट्यासह एक जीवंत काडतूस देवपूर पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उमेश पानथरे असे त्या तरुणाचे नाव आहे.
संशयास्पद फिरणाऱ्या तरुणाच्या देवपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, गावठी कट्टा जप्त
जीटीपी स्टॉपजवळ असलेल्या विठ्ठल मंदिर परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळून एक गावठी कट्ट्यासह एक जीवंत काडतूस देवपूर पोलिसांनी जप्त केले.
देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांना खबऱ्याने गावठी कट्टा घेऊन तरुण संशयास्पद फिरत असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीवरुन देवपूर पोलिसांचे पथक जीटीपी स्टॉप जवळील विठ्ठल मंदिराजवळ शोध घेत होते. त्यावेळी विठ्ठल मंदिराजवळ आकाश हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला पोलिसांनी विचारले असता, त्याने पोलिसांशी अरेरावी करत वादही घातला.
पोलिसांनी वेळीच खाक्या दाखवल्यानंतर तो वठणीवर आला. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतूस आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील गावठी कट्टा जप्त केला. या प्रकरणी शशिकांत देवरे, एस. के. सावळे, एम. वाय. मोरे, एस. सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.