धुळे -शहरातील पितांबर नगर भागातील समर्थ कृपा ज्वेलर्स याठिकाणी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. या संशयितांकडून तब्बल 2 लाख 65 हजार 100 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. येथील पितांबर नगर भागात असलेल्या समर्थ कृपा ज्वेलर्स या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. या घटना रोखण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरत असताना समर्थ कृपा ज्वेलर्स याठिकाणी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मधूकर राजाराम वाघ, दिपक उर्फ बापू विठ्ठल वाणी आणि सुनील गुलाब मालचे या 3 आरोपींना अटक केली आहे. या अटकेत पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 65 हजार 100 रुपये किमतीचे 41.660 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1 किलो 963 ग्रॅम 690 मिलि वजनाची चांदी हस्तगत केली आहे. तसेच रोख रक्कम देखील पोलिसांनी जप्त केली आहे.