धुळे - शहरात महापालिकेच्या वतीने विकास कामांचा गाजावाजा करण्यात येत आहे. मात्र, रस्त्यांची अवस्था 'जैसे थे' आहे. धुळ्यात जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील रस्त्यावरच मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत.
धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या घराशेजारील रस्त्यावरच खड्डे खुद्द जिल्हाधिकारी महोदयांचे लक्ष जाऊ नये ही दुर्दैवाची बाब
खड्यात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रस्त्यावरून दिवसभर विविध प्रशासकीय अधिकारी येतात आणि जातात. जवळच जिल्हा परिषद आणि अन्य शासकीय कार्यालये आहेत, मात्र कोणाचेही या रस्त्याकडे लक्ष जाऊ नये ही एक शोकांतिका आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी
खुद्द जिल्हाधिकारी महोदयांचे रोजच्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष जाऊ नये ही दुर्दैवाची बाब असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर अनेक वेळा अपघात होऊन देखील ही समस्या सोडविण्यात आलेली नाही. या रस्त्याचे लवकरात लवकर काम करण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.