धुळे - गर्भवती महिलेस आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांना चक्क बांबूंचा आधार घेऊन खांद्यावरती झोळी करून तीन किलोमीटरपर्यंत न्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे अंतर कापल्यानंतर या गर्भवती महिलेस अखेर रुग्णवाहिका नशीब आली. त्यानंतर तिला बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व महिलेची प्रसूती झाली.
गर्भवती महिलेस प्रसूतीपेक्षाही जास्त झोळीतून केलेल्या प्रवासाच्या कळा, तीन किलोमीटर खांद्यावरून पोहोचवले रुग्णालयात - गर्भवती महिलेला झोळीत घालून पोहोचवले रुग्णालयात
सरकार आरोग्य यंत्रणा सुदृढ व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगते. मात्र, धुळे जिल्ह्यातील थूवाणपाणी येथील गर्भवती महिलेला झोळीत टाकून खांद्यावरून तीन किलोमीटर रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर तिची प्रसूती झाली.
जिल्ह्यामधील शिरपूर तालुक्यातील थुवाणपाणी या गावात हा प्रकार घडला आहे. थुवाणपाणी हे अतिदुर्गम भागात असलेले गाव आहे. या गावापासून गुऱ्हाळपाणी या गावापर्यंत तीन किलोमीटरचे अंतर आहे. या गावापर्यंत थुवानपाणी गावातल्या गावकऱ्यांना पोहोचण्यासाठी चक्क रस्ताच नाही. त्यामुळे या गावात 108 ही रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये थुवानपाणी गावातील वसंता रविंद्र पावरा (वय-22) या गरोदर महिलेस अचानक प्रसूतीवेदना होऊ लागल्या. मात्र, गुऱ्हाळपाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे कुटुंबीयांनी बांबूंला साडी बांधून झोळी तयार केली. झोळीतून तिला गुऱ्हाळपाणी गावापर्यंत नागरिकांनी खांद्यावर नेते. त्यानंतर तेथील आशा वर्करने बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका मागविली. वसंता पावराला बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे तिची सुखरूप प्रसूती झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या आठ वर्षापासून या भागासाठी रस्ता आणि आरोग्य उपकेंद्राची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र, अद्यापही रस्ता मिळाला नाही.