धुळे -आकाशवाणी केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करणाऱ्या प्रदीप जारोंदे या व्यक्तीने एका निवेदिकेची मद्यपान करून छेड काढल्याची घटना घडली. मात्र, बदनामीच्या भीतीने तिने पोलिसात तक्रार दाखल केली नाही. या घटनेची माहिती मिळताच, मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आकाशवाणी केंद्रात जाऊन जारोंदेला मुलीची माफी मागायला लावली. यावेळी आपण हे कृत्य केल्याची कबुलीदेखील त्याने दिली.
निवेदिकेची छेड काढणाऱया अधिकाऱयाला मनसे कार्यकर्त्यांनी मागायला लावली माफी - धुळे
रविवारी सायंकाळी कार्यक्रम अधिकारी प्रदीप जारोंदे मद्य प्राशन करून आकाशवाणी केंद्रात आला. याठिकाणी कामानिमित्त आलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला त्याने आपल्या दालनात बोलवून सदर तरुणीचा हात धरून छेड काढली.
प्रदीप जारोंदे हा धुळे आकाशवाणी केंद्रात नागपूर येथून बदली होऊन आला आहे. जारोंदे रविवारी सायंकाळी मद्य प्राशन करून आकाशवाणी केंद्रात आला. याठिकाणी कामानिमित्त आलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला प्रदीप जारोंदे याने दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून आलेला आरएनचा मेल तपासण्याचे निमित्त करून आपल्या दालनात बोलवले. याठिकाणी गेल्यावर जारोंदेने सदर तरुणीचा हात धरून छेड काढली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या या तरुणीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. याप्रकरणी तिचे पालक देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षकाने मुलीची बदनामी होईल, असे सांगून सदर प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. बदनामीच्या भीतीने मुलीच्या पालकांनीदेखील तक्रार दाखल केली नाही.
याप्रकाराबाबत मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी धुळे आकाशवाणी केंद्र गाठले. याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जारोंदे याला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला असता त्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली. यावेळी मनसे पदाधिकाऱयांनी जारोंदेला सदर मुलीची कान पकडून माफी मागावयास लावली. या प्रकारामुळे धुळे आकाशवाणी केंद्र चर्चेत आले असून, अशा अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.