धुळे - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंद दरम्यान धुळे शहरात दगडफेक करणाऱ्या तसेच या बंदला हिंसक वळण देणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जे यांनी दिले आहेत.
भारत बंदवेळी दगडफेक करणारे नऊ जण पोलिसांच्या ताब्यात सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि. 29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंद आंदोलनादरम्यान धुळे शहरात काही आंदोलनकर्त्यांनी शहरातील चाळीसगाव रोडवरील शंभर फुटी रोड येथे दगडफेक केली. एवढ्यावर न थांबता त्यानी नागरिकांच्या व पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करत नुकसान केले. यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
हेही वाचा - आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा सेनेकडून निषेध, कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जे यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली. यात समावेश असणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दोर्जे यांनी दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्या नुसार पोलिसांनी आत्तापर्यंत 9 जणांना ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यात हारून रफिक खाटीक, शाहरुख अब्बास खाटीक, सय्यद हनीफ सय्यद इब्राहिम, रफीक गुलाब शेख, फिरोज खान नसिर खान, तौसिफ रज्जाक शेख, आसिफ भोलू शहा, शाहरुख मनियार आणि राहुल वाघ यांचा समावेश आहे. अन्य संशयीत आंदोलांकर्त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा - धुळ्यात भारत बंदला हिंसक वळण, दगडफेक करत वाहनांची तोडफोड