धुळे - नरडाना एमआयडीसीमधील वंडर सिमेंट कंपनी स्थानिकांना रोजगार देत नसल्याच्या संदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करत आंदोलन केले. या आंदोलनामुळे नरडाना एमआयडीसीत खळबळ उडाली आहे.
स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी, नरडाना एमआयडीसीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, असे शासनाचे निर्देश असताना देखील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने स्थानिकांना रोजगार देत नाहीत. स्थानिकांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी नरडाना एमआयडीसीमधील वंडर सिमेंट कंपनीत आंदोलन केले.
80 टक्के स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे, असे शासनाचे निर्देश असताना देखील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने स्थानिकांना रोजगार देत नाहीत. स्थानिकांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी नरडाना एमआयडीसीमधील वंडर सिमेंट कंपनीला निवेदन देण्यासाठी गेले असता व्यवस्थापकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यलयाची तोडफोड केली. तसेच वंडर सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापकांनी जातीवाचक पद्धतीने कार्यकर्त्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावी केली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करीत व्यवस्थापकांविरुद्धचा रोष व्यक्त केला. या घटनेमुळे नरडाना एमआयडीसीत एकच खळबळ उडाली असून, यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत व्यवस्थापकांचा निषेध व्यक्त केला. यापुढील काळात स्थानिकांना रोजगार न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.