धुळे : सध्या राज्यासह धुळे शहरात थंडीचे (severe cold) प्रमाण वाढत आहे. धुळे शहराचे तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्यानं त्याचा जनजीवनावर परिणाम झाल्याचं युवासेनेनं म्हटलं आहे. थंडीचं प्रमाण वाढल्यानं सकाळी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना थंडीचा त्रास होत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रकृती देखील खराब होत आहे. त्यांची हजर संख्या देखील कमी होत असल्यानं सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेत बदल (morning session of school held late) करण्यात यावा, अशी मागणी धुळे जिल्हा युवासेनेतर्फे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे (Yuva Sena demand to education authorities) करण्यात आली आहे.
थंडीचा कडाका आणि विद्यार्थ्यांना त्रास : शाळेच्या वेळेत काही तासांचा बदल केल्यास अनेक लहान बालकांना तसेच पालकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे थंडीमुळे लहान बालकांच्या प्रकृतीला निर्माण झालेला धोका टाळता येईल, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. धुळे शहरात बरेच विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ग्रामीण भागातुन शहरात शिक्षणासाठी दररोज येतात. एवढ्या कडाक्याच्या थंडीत, एवढ्या भल्या पहाटे कुठल्यातरी वाहनाने येणे म्हणजे कसोटीच. काही पालक तर मोटरसायकली वरुन पाल्यांना शाळेपर्यंत सोडायला येतात. सध्या अशा वातावरणात हे सर्व खुपच त्रासदायक असल्यानं या समस्यांवर गांभीर्याने विचार करुन, शाळांच्या वेळेत योग्य तो बदल करावा अशी मागणी युवा सेनेनं निवेदनाद्वारे केली आहे.