धुळे -धुळे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त, उपायुक्तासह 4 अधिकाऱ्यांची अपसंपदा प्रकरणी चौकशी करण्याची मागणी एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी मुख्यमंत्री, आणि विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. आमदार शहा यांच्या या मागणीमुळे धुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.
धुळे शहरातील रस्त्यांच्या प्रश्नी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणाला आमदारदेखील कंटाळले. तिथं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय, असे उद्विग्न विधान धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी उपस्थित करत धुळे महानगरपालिकेतील 4 अधिकाऱ्यांची अपसंपदा प्रकरणी चौकशी करावी, अशा आशयाचे पत्र आमदारांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना दिले. यामुळे धुळे महापालिकेत खळबळ माजली आहे. महापालिकेत एकाच जागेवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची देखील चौकशीची मागणी आमदार फारुख शहा यांनी केली आहे. यामध्ये, धुळे महानगर पालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी महेश मोरे, अभियंता कैलास शिंदे या चार अधिकाऱ्यांची अपसंपदा प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आमदारांनी केली आहे.