धुळे- देशात विविध भागात अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्याने अनेक परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. भिवंडीहून असा एक डंपर मजूरांना घेवून निघाला होता. या डंपरचा धुळ्याजवळ अपघात झाला. त्यात एक परप्रांतीय मजूर जागीच ठार झाला तर जवळपास १५ ते २० जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली.
गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीयांच्या डंपरला धुळ्याजवळअपघात, 1 ठार तर 15 जण जखमी
रिलायंस पेट्रोलपंपाजवळ झालेल्या अपघातात डंपरमधून प्रवास करणाऱ्या परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. डंपरमधून प्रवास करणारे 15 ते 20 प्रवासी जखमी झाले.
अपघातग्रस्त वाहने
शहरातून दररोज हजारो मजूर ट्रक, डंपर आदी वाहनाने महामार्गावरुन प्रवास करत आहेत. डंपर (क्रमांक एम एच ४८ ए जी ५४२७) महामार्गावरुन जात असताना एका ट्रकने (क्रमांक ओडी १८ पी ३९३३) त्यास धडक दिली. या अपघातात डंपरमध्ये पुढे बसलेल्या परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात डंपरमध्ये मागे बसलेले मजूर जखमी झाले आहेत. त्यात पुरुष, स्त्रिया व लहान मुलांचा समावेश आहे. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.