धुळे - जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे डी. एस. अहिरे यांनी भाजपच्या मंजुळा गावित यांचा पराभव केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मिळालेले मताधिक्य पाहता विधानसभा निवडणुकीत भाजपचे पारडे जड राहील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना आहे. या मतदारसंघातील प्रश्न आजही कायम आहेत, यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत साक्री विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -साहेब जो आदेश देतील तो मान्य, राजीनाम्यानंतर अजित पवारांचे स्पष्टीकरण
साक्री विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो, तो भाजपच्या गोविंद शिवराम चौधरी यांच्या नावाने. सन १९८४ ते १९९९ या कालावधीत गोविंद चौधरी हे भाजपच्या तिकिटावर या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना मंत्रिपदही मिळाले होते. शिवराम चौधरी यांच्या रुपाने प्रथमच साक्री तालुक्याला मंत्रिपद मिळाले होते. मात्र, आजतागायत या मतदारसंघातील समस्या कायम आहेत, काँग्रेसचे डी. एस. अहिरे हे येथील विद्यमान आमदार आहेत. साक्री तालुका ओळखला जातो तो, वन शेती आणि सेंद्रिय शेती, अशी ओळख असलेल्या बारीपाड्यामुळे. सूरत-नागपूर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा तालुका असूनही आजवर विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डी. एस. अहिरे यांनी भाजपच्या उमेदवार आणि धुळे महापालिकेच्या माजी महापौर मंजुळा गावित यांचा ३ हजार ३२३ मतांनी पराभव केला होता. केवळ तीन हजार मतांच्या फरकाने मंजुळा गावित यांचा पराभव झाल्याने काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे. यंदाच्या निवडणुकीत मंजुळा गावित ह्या भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहेत साक्री तालुक्यातील समस्या?
पवन वीज निर्मिती, सौर ऊर्जा निर्मिती असे महत्त्वाचे प्रकल्प या तालुक्यात असून देखील याठिकाणचा रोजगाराचा प्रश्न कायम आहे. त्याचसोबत सूतगिरणी, साखर कारखाने यामुळे हा प्रश्न अधिक जटिल झाला आहे. रोजगार, औद्योगिक विकास यांचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. यासोबत पाण्याचे दुर्भिक्ष्य देखील असल्याने गेल्या अनेक वर्षात पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. जिल्ह्यातील अक्कलपाडा, पांझरा आणि मालनगाव ही अत्यंत महत्त्वाचे जलप्रकल्प या मतदारसंघात असून देखील सिंचनाचा प्रश्न कायम आहे.