धुळे - साक्री तालुक्यातील धाडरे गावात अंगावर वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी शेळ्यांना चरण्यासाठी शेतात घेऊन गेली होती, त्यावेळी तिच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. अर्चना अशोक ठाकरे (वय 15) असे मृत तरुणीचे नाव आहे. या तरुणीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.
धुळ्यातील धाडरे गावात वीज पडून तरुणीचा मृत्यू - young girl death
तरुणी शेळ्यांना चरण्यासाठी शेतात घेऊन गेली होती, त्यावेळी तिच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा आणि बकऱ्यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, साक्री तालुक्यातील धाडरे या गावात आज दुपारी वीज पडली. त्यात अर्चनाचा मृत्यू झाला. अर्चना येथील लालचंद केशव मोरे यांच्यातील पाहुणी आहे. मोरे यांच्या साडूची ती मुलगी असून इयत्ता अकरावीत शिकत होती. ती आज तिच्या काकांच्या शेतात बकऱ्या फिरवण्यास (चरण्यासाठी) घेऊन गेली होती. त्यावेळी अचानक तिच्या अंगावर व तिच्याबरोबर असलेल्या चार बकऱ्यांवर वीज कोसळली.
त्यानंतर तिला तत्काळ भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णसेवक गोकुळ राजपूत व गावातील सतीश पवार व अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र, तिला वाचवण्यात अपयश आले. या घटनेत तीन बकऱ्यांचाही मृत्यू झाला. कुटुंबास तत्काळ मदत मिळून देण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार पाटील यांनी संबंधित यंत्रणेला तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.