धुळे - शहरातील सुप्रसिद्ध वकील कुंदन पवार यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. खटल्यामध्ये रस न दाखवण्याचा इशारा त्यांना देण्यात आला असून, त्यांना ही धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. याप्रकरणी धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध वकील कुंदन पवारांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - धुळे जिल्हा न्यायालय
शहरातील सुप्रसिद्ध वकील कुंदन पवार यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
धुळे जिल्हा न्यायालयातील वकील कुंदन पवार हे न्यायालयात काम करत असतांना त्यांच्या नावाने एक लिफाफा आला. काम पूर्ण झाल्यावर त्यांनी तो लिफाफा उघडला असता त्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. बबलू उर्फ निलेश सुरेश गायकवाड आणि सागर पगारेच्या खटल्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला तर तुमचा गेम वाजवू, अशा भाषेत पवार यांना धमकी देण्यात आली आहे.
हे पत्र निनावी असून या पत्रामुळे वकील संघात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत पोलीस महासंचालकांची भेट घेणार असल्याची माहिती कुंदन पवार यांनी दिली.